बुधवार, 19 सितंबर 2018

मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी

बई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राज यांनी व्यंगचित्र रेखाटताना मोदी आणि अमित शहा यांना संघाच्या वर्गाबाहेरचे स्वयंसेवक दाखवले आहे, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था आपल्या पायाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे राज यांना त्यामध्ये सूचित करायचे आहे. तर, एक स्वयंसेवक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात दिलेले भाषणाचे स्मरण करत असल्याचे दाखवले आहे. आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मालकी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विविध विचारांचे अदान प्रदान केले जाते, असे भागवत यांनी सांगितले होते. त्यावर, संघातील स्वयंसेवक म्हणतो की, भागवतजी आम्हाला आजपर्यंत संघातील शाखेत तुम्ही म्हणत आहात तेच शिकवले गेले आहे. मग या दोघांना म्हणजेच मोदी आणि शहा यांना ते शिकवलं गेलं नाही का ? हे दोघे आपली लोकशाही विसरुन का वागत आहेत, आपली व्यवस्था पायाखाली आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न त्या स्वयंसेवकांने भागवतांना केला आहे, अशा स्वरुपातील व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. 

गुरुवार, 30 अगस्त 2018

सनातनसाठीच डाव्यांना उचलले : राज ठाकरे

औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.
"व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, "मराठवाड्यातून मुली पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. याबद्दल कुणीच बोलत नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे. याला सरकारच जबाबदार आहे.''
काय म्हणाले राज ठाकरे.... 

- सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते "ते' हैद्राबादवरुन येतात, भीतीदायक वातावरण निर्माण करतात. दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात.
- कामावर मतदान होते, याच्यावरील माझा विश्‍वास उडाला आहे. विकासावर मतदान होतच नाही. औरंगाबादचे राजकारण कित्येक वर्ष धर्मावरच सुरु आहे. कामाची पावती मतदानातून मिळाली तरच विकास होईल.
- थापा मारुनच सत्तेत राहता येते. तर महिना- दोन महिने मलाही भाजपात जाऊन यावे लागेल. तसेही आजच पंतप्रधान नेपाळला गेलेत. नवीन "थापा' आणायलाच गेले असावेत.
- 25 वर्षांत औरंगाबाद शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही. लोकप्रतिनिधींना तुमची भीती वाटत नाही. त्यामुळेच कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे.
- प्रभागांमुळे मोठ्या शहरांची वाट लागली आहे. एका प्रभागात चार नगरसेवक त्यांची तोंडे त्या अशोकस्तंभावरील चार सिंहासारखी असतात. जो दिसत नसतो, तो प्रभागात काड्या करण्याचे काम करतो.
- कंपन्यांच्या "सीएसआर' फंडातून शहर विकासाची कामे होतात. मात्र त्यात पैसे खायला मिळत नसल्याने अडचणी येतात. त्याचा सामना करण्याची तयारी असेल तर तशी कामे औरंगाबादेतही करता येतील.
मराठा क्रांती मोर्चाची पोरं वाळूज प्रकरणात नव्हतीच 
वाळुजमध्ये कंपन्यांवर दगडफेक झाली, त्यात मराठा क्रांती मोर्चाची पोरं नव्हतीच. दंगल घडवणारे परप्रांतीयच होते, हेच मी केव्हापासून सांगतोय. मोर्चाला नेतृत्व नाही, त्यामुळेच कुणीही येतोय आणि बदनाम करतोय. पोलिसांकडून समोर आलेली नावे मराठी पोरांची असली तरी, माझ्याकडे आलेल्या रिपोर्टप्रमाणे दंगल घडवणारे परप्रांतीयच आहेत, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

रविवार, 12 अगस्त 2018

'साठ वर्षातील सिंचनाचा पैसा गेला कुठे'

पुणे- गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले.
गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा व्यवस्थित कामाला लागला असता तर गावे केव्हाच जलयुक्त झाली असती असेही राज यांनी म्हटले आहे. जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधारे खात्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी टीका राज यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे काम केले आहे ते सरकारने केले नाही. ते सरकारने केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी असती. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, यामुळे अमिर खान यांचे काम मोठे आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्विकारत नाही. पण त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तो अवश्य स्विकारावा, अशी विनंतीही राज यांनी अमिर खानला केली.
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, 26 जुलाई 2018

मराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे

मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.
एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारने ह्यावर तत्परतेने भूमिका घ्यायला हवी होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने करायला हवी होती. पण त्यांनी तसे केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई - वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून. आपले शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तर परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.
ह्याचवेळी सरकारला एक इशारा. सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असे की सरकारला  "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसते आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचे कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारने सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

मंगलवार, 26 जून 2018

लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना

मुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.
आणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला. 'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक, उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.